भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा – उद्धव ठाकरे 

मुंबई – जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray)  यांनी भाजपला लगावला आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur north election) आज उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून सभेला संबोधित केलं. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिडकारलं. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदूहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा. असं ते म्हणाले.