‘ईडी कोर्टात रकमेचा आकडा देताना चुकतेच कशी ; देवेंद्र फडणवीसांचे आरोप निराधार’

मुंबई : महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली असून ते कोठडीत आहेत.

मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला ५५ लाख दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केला होता मात्र ईडीने कोर्टात फक्त पाच लाख म्हटल्याने देवेंद्र फडणवीस हे निराधार आरोप करत होते हे सिध्द होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

आज ईडीने न्यायालयाला मागील रिमांड याचिकेत टायपोग्राफिकल त्रुटी असल्याने कथित ५५ लाख फक्त ५ लाख म्हणून वाचले जावेत असे म्हटले आहे (माध्यमांनी हे वृत्त दिले आहे) त्यामुळे यामध्ये कोणती रक्कम खरी आहे आणि ईडीने अशी चूक का केली हे फडणवीस यांनी आता स्पष्ट करावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात खरे चित्र समोर येईल, अशी आशाही महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.