धरण उशाला आणि कोरड घशाला; धायरी परिसरात भीषण पाणी टंचाई; नागरिक हैराण

धायरी – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धायरी परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.(Big water problem in Dhayari area). गेल्या आठ दिवसांपासून या भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून या समस्येमुळे या भागातील नागरिक सध्या प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत.

पुण्यातील धायरी परिसरात बड्या इमारती आहेत. अनेकांना सुखसुविधा मिळेल या हेतूने नागरिकांनी या उपनगर असलेल्या भागात घरं खरेदी केली. मात्र आता काहीच दिवसात या सगळ्या नागिरकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात टँकरद्वारे सुद्धा पाणीपुरवठा (Water supply by tanker) व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांमध्ये आता रोष वाढू लागला आहे.

दरम्यान, महापालिकेकडून आवश्यक ती पावले उचलली जात असून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. गेटची वगेरे कामे सुरु आहेत ती झाल्यावर काही फरक पडू शकतो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे या विभागातील उपअभियंता शंकर दुदुस्कर (Shankar Duduskar) यांनी सांगितले.

टँकर द्वारे सुद्धा या भागात आम्ही पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र सध्या पालखीमुळे टँकर उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे असं देखील त्यांनी सांगितले. पाऊस पडल्यावर या स्थितीत काही सुधारणा होऊ शकेल मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या वरिष्ठ स्थरावर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती त्यांनी आझाद मराठीशी बोलताना दिली.

दरम्यान, या भागातील अधिकारीच नव्हे तर लोकप्रतिनिधी, नेते मंडळी सुद्धा या समस्येकडे लक्ष देत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीसाठी चमकोगिरी करणारे नेते या समस्येवर गप्प का आहेत हे देखील आम्हाला कोडे पडले आहे. धायरीकरांना कुणी वाली उरला आहे की नाही असा देखील संतप्त सवाल नागरिक करत आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय सध्या धायरीकरांना येत आहे असं नागरिकांचं म्हणणे आहे.