दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजार रुपयांचे बक्षीस देणार, नाभिक समाज आक्रमक

जालना : जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार?’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरु असल्याचं म्हटलं. हे बोलतानाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली होती.

रावसाहेब दानवे यांच्या या बेजवाबदार विधानामुळे नाभिक समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. रावसाहेब दानवे यांची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दाववेंच्या या वक्तव्याचा नाभिक समाजाने तीव्र निषेध केला असून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अशी भूमिका नाभिक समाजाने घेतली आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे ?

‘तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसं आघाडी सरकारचं सुरु आहे. विकासकामांना तुटपुंजा निधी देत महाविकास आघाडी सरकारनं लटकत ठेवलं आहे’, असं दानवे म्हणाले होते. दानवेंच्या याच वक्तव्यामुळे नाभिक समाज आक्रमक झाला आहे.