पैगंबर मुहम्मद यांची मुलगी फातिमावरील चित्रपटावरून नवा वाद

नवी दिल्ली- ‘द लेडी ऑफ हेवन’ (the lady of heaven) या ब्रिटिश चित्रपटाबाबत ब्रिटनमध्ये वाद आणखी वाढला आहे. चित्रपटाबाबत आंदोलने केली जात आहेत. या चित्रपटावर ईशनिंदेचा आरोप होत आहे. या चित्रपटावर बंदी घालावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. चित्रपटाला विरोध करणाऱ्यांमध्ये मक्का मशिदीचे प्रमुख इमाम कारी मोहम्मद असीम (The chief imam of the mosque is Qari Mohammad Asim) यांचाही समावेश आहे. त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवताच सरकारने त्यांच्यावर कारवाई केली. सरकारने इमाम यांना सल्लागार पदावरून बडतर्फ केले आहे.

लीड्समधील मक्का मशिदीचा इमाम कारी असीम, इस्लामोफोबियावर यूके सरकारचा स्वतंत्र सल्लागार म्हणून काम करत होता. चित्रपटाला विरोध झाल्यानंतर शनिवारी त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. प्रेषित मुहम्मद यांच्या मुलीवरील चित्रपटावर बंदी घालण्याच्या आंदोलनाला इमाम पाठिंबा देत होते. त्यानंतर सरकारने त्यांच्यावर कारवाई केली.

‘द लेडी ऑफ हेवन’ या ब्रिटीश चित्रपटाला विरोध करणाऱ्या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल ब्रिटिश सरकारने इमाम कारी मोहम्मद असीम यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिल्याने त्यांची नोकरी संपुष्टात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ब्रिटिश चित्रपटाबाबत सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान असीमने एका निवेदनात म्हटले होते की, ‘द लेडी ऑफ हेवन’ हा ‘अपमानास्पद चित्रपट’ आहे. या चित्रपटामुळे मुस्लिम समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत.

वास्तविक, द लेडी ऑफ हेवन हा ब्रिटिश चित्रपट पैगंबर मुहम्मद यांची मुलगी फातिमा हिच्या कथेवर आधारित आहे. जे सुन्नी मुस्लिमांना पसंत पडलेले नाही आणि याबाबत आंदोलने केली जात आहेत. चित्रपटावर टीका करणारे याला ईशनिंदा म्हणत आहेत. प्रेषित मुहम्मद आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर चित्रपट बनवणे म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आहे, असे या चित्रपटाला विरोध करणारे लोक मानतात.