केकेआरचा कॅप्टन नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून विनयभंग, कारचा पाठलाग करत केले असे कृत्य

Nitish Rana’s wife Harassment : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाची (Nitish Rana) पत्नी सच्ची मारवाह हिचा दिल्लीत विनयभंग झाला. राणाची पत्नी (Nitish Rana Wife) दक्षिण दिल्लीत असताना दोन आरोपींनी तिचा पाठलाग केला. यानंतर दिल्लीतील कीर्ती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात दोन जण आरोपी असून दोघांना अटक करण्यात आली आहे. कीर्ती नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नितीश राणा याच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कीर्ती नगर पोलिस ठाण्यात ईमेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत म्हटले आहे की, 4 मे रोजी रात्री 8.30 वाजता पीडित महिला (राणाची पत्नी) तिच्या ड्रायव्हरसोबत कारमधून घरी जात होती. छतरपूरहून मॉडेल टाऊनकडे जात असताना चौकात सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत असताना दोन दुचाकीस्वार भरधाव वेगात आले. कीर्ती नगरच्या या चौरस्त्यावर पीडित महिलेच्या कारसमोर दुचाकी थांबली आणि महिलेकडे रोखून बघत आरोपीने हाताने कारला धडक दिली. याप्रकरणी 6 तारखेला एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कीर्ती नगरच्या त्या चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपींची ओळख चैतन्य शिवम आणि विवेक अशी झाली. दोघेही 18 वर्षांचे आहेत. एक आरोपी पांडव नगरमध्ये तर दुसरा पटेल नगरमध्ये राहतो. दोन्ही आरोपींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.