म्हापशाचा लोकनेता : जोशुआ पीटर डिसोझा ; दिवंगत पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा युवा नेता

म्हापसा : माजी उपमुख्यमंत्री तथा म्हापशाचे माजी आमदार कै. फ्रांसिस ऊर्फ बाबूश डिसोझा यांचा राजकीय वारसा सध्या समर्थपणे पेलणारे विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने स्वत:च्या सुमारे अडीच-तीन वर्षांच्या अल्प कार्यकाळात म्हापशातील कित्येक विकासकामांना चालना देण्याचे कार्य केले आहे. समाजकारण व राजकारणाचे बाळकडू घरातच प्राप्त झाले होते. त्यामुळेच ते नगरसेवकपदी निवडून आले व वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदारपदी निवडून आले व खऱ्या अर्थाने म्हापशातील लोकनेता झाले. या शहराचे विकासपुरुष ही बिरुदावलीही त्यांना प्राप्त झालेली आहे.

जोशुआ डिसोझा यांचे वडील दीर्घ काळ म्हापसा पालिका तसेच राज्य विधानसभेच्या राजकारणातील लोकप्रतिनिधी होते. सुमारे पाव शतकापेक्षा अधिक काळ म्हापशातील राजकारणावर त्यांची जबरदस्त पकड राहिली. त्यातूनच जोशुआ डिसोझा यांच्यावर समाजकारणाचे संस्कार बालवयात होत गेले व जनमानसाच्या इच्छा-आकांक्षांची परिपूर्ती करण्याच्या दृष्टीने त्यांचा मन:पिंड घडत गेला. त्यामुळेच नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर केलेल्या लोकोत्तर कार्याच्या बळावर त्यांची अगदी तरुण वयात आमदारपदी निवड झाली.

त्यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस ऊर्फ बाबूश डिसोझा हे सलग पाच कार्यकाळांसाठी म्हापसा मतदारसंघाचे आमदार होते. त्या वातावरणात वाढलेले जोशुआ यांच्या गळ्यात वर्ष २०१९ मधील पोटनिवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून विजयश्रीची माळ पडली, ती पुन्हा कधीही मागे वळून न बघण्यासाठीच.

जोशुआ यांचा जन्म दि. १२ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. २०१५मध्ये जोशुआ यांनी पहिल्यांदा म्हापसा पालिका निवडणूक लढविली व ते नगरसेवक बनले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचे वडील बाबूश यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी म्हापशातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली व तिथेही त्यांनी विजय प्राप्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा भाजपाचे उमेदवार आहेत.

आपल्या सुमारे अडीच वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत जोशुआ यांनी म्हापशात अनेक छोटे-मोठे विकास प्रकल्प राबविले. यामध्ये नवीन हंगामी म्हापसा बसस्थानकाचे लोकार्पण, म्हापसा नदीवरील नवीन चौपदरी पुलाचे काम, म्हापसा शहरातील भूमिगत वीजवाहिन्या इत्यादी काही महत्त्वपूर्ण कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. इतक्या कमी काळात जोशुआ यांनी त्या तीन मोठ्या प्रकल्पांना चालना दिली. त्याशिवाय, म्हापसा मार्केटमधील मांस प्रकल्पाचे उद्घाटन करून कुचेली येथील कचरा पुन:प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करून तो मार्गी लावण्यात आला. मागील अडीच वर्षांत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे.

आमदार जोशुआ डिसोझा यांनी पुढाकार घेतल्यानंतर पहिल्या लॉकडाउनच्या काळात संपूर्ण म्हापसा बाजारपेठेतील गटारांची साफसफाई करण्यात आली. तेथील सर्व गटारे उपसून, साचलेला गाळ काढण्यात आला. त्यामुळे, गेल्या वर्षी पहिल्यांदाच म्हापसा मार्केटमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले नाहीत. याचे श्रेय खर्‍या अर्थाने आमदार जोशुआ व भाजपाप्रणित म्हापसा पालिकेला जाते.

मध्यंतरी, कोविडच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेवेळी जोशुआ यांनी सढळ हस्ते गोरगरिबांसह कित्येकांना मदतीचा हात दिला. म्हापशातील प्रत्येक सामान्य जनतेसाठी ते धावले. जीवनाश्यक वस्तूंसह आर्थिक साहाय्य करण्यात जोशुआ यांनी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली. त्यांच्या या स्वभावामुळे म्हापसेकरांकडून त्यांना खूप प्रेम व आपुलकी लाभली. त्यांच्या या वागण्यात स्व. बाबूश यांचा झलक म्हापसेकरांना जाणवते व नागरिक त्यासंदर्भात बोलूनही दाखवतात. नेहमीच आपल्या हसर्‍या चेहर्‍याने त्यांनी दारी आलेल्या प्रत्येकांचे स्वागत करीत आदर व मानसन्मान दिला. युवा असो किंवा ज्येष्ठ मतदारांमध्ये जोशुआ यांनी आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

२०१५च्या पालिका निवडणुकीतून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. प्रभाग १३मधून ते जिंकून आले होते. स्वत:चे वडील माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस ऊर्फ बाबूश डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली जोशुआ यांनी आपले राजकारणाचे धडे गिरविले. वडिलांच्या निधनांतर, जोशुआ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिवाय म्हापसेकरांकडून पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव येत होता. अशा कठीण परिस्थितीत व युवा असताना ते डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे ठरवले. आणि मागील अडीज वर्षांपासून सातत्याने स्वतःच्या हिमतीवर व लोकांच्या आशीर्वादावर जोशुआ हे लोकसेवा करीत आहेत.

आगामी निवडणुकीतून पुन्हा म्हापसेकरांनी आपल्याला लोकसेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंती ते करतात. शिवाय या संधीचे सोने करीत म्हापसेकरांच्या ज्या इच्छा व आकांशा आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी सर्वस्व देणार, असेही ते सांगतात. ज्यामध्ये, म्हापसा मुख्य बसस्थानकाचे काम, बहुमजली पार्किंगची व्यवस्था, तसेच तार नदीचे सौंदर्यीकरण करीत, ते पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यावर भर देणार, हा त्यांना शब्द आहे.

माझा शाश्वत विकासावर विश्वास : जोशुआ डिसोझा

आमदार जोशुआ डिसोझा म्हणतात, माझा शाश्वत विकासावर विश्वास आहे आणि ज्याचा म्हापसेकरांना पुढील ५० वर्षे फायदा होईल. म्हापशाच्या विकासासाठी दूरदृष्टीने युक्त असलेले अनेक प्रकल्प आहेत. [सेंट झेवियर कॉलेजजवळ रॉक गार्डन आणि वॉक ट्रक उभारला जाईल]. म्हापसा शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन आंतरराज्य बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम करून तो कार्यान्वित केला आहे. नवीन सरकारी संकुल व इमारतींना भूमिगत पार्किंगची तरतूद अनिवार्य असावी. म्हापसा मार्केटचा पुनर्विकास करताना त्याचे पारंपरिक सौंदर्य राखले जाईल. सध्याचे बालोद्यान आणि फुटबॉल मैदान यांची सुधारणा करून लोकांसाठी विशेषतः सायंकाळी खुली ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे म्हापसा नदीकाठचा पुनर्विकास करण्याबरोबरच म्हापसा नदीजवळील गणेश विसर्जन स्थळाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.