माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर समोर या; शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक

पुणे :   भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही शाईफेक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून हे कृत्य केलं गेल्याचं सांगितलं जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.

दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. तरीही अशाप्रकारे भ्याडपणे माझ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे, हिंमत असेल तर समोर या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सुट दिली तर काय होईल? पण ही आमचा संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेही उत्तरं देता येतात. माझ्या विधानानंतर मी लगेच स्पष्टीकरण दिले होते. मुळात एका गिरणी कामगाराचा मुलगा या पदापर्यंत पोहोचणे, हे सरंजामशाही वृत्तीच्या लोकांना झेपत नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले सुरू आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.