मुंबई हारली पण तिलकने मने जिंकली… राहायला स्वत:चे घरही नसणारा तिलक वर्मा आज बनलाय भारताचे भविष्य!

बेंगलोर- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (MIvsRCB) संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमर झालेला आयपीएल २०२३ मधील पाचवा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात बेंगलोरच्या खेळाडूंनी मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांची अक्षरश: कोंडी केली. बेंगलोरने २२ चेंडू शिल्लक असताना ८ विकेट्सने मुंबईवर सोप्पा विजय मिळवला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्या मजबूत भागीदारीच्या जोरावर बेंगलोरने सतराव्या षटकातच ८ विकेट्स शिल्लक असताना सामना खिशात घातला.

जरी या सामन्यात मुंबईवर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली असली तरीही मुंबईच्या एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली. तिलक वर्मा (Tilak Varma) असे या खेळाडूचे नाव आहे. मुंबईची फलंदाजी फळी रुळावरुन घसरत असताना तिलकने धाडसी खेळी केली. २० वर्षीय तिलकने ४६ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीनंतर त्याला भारतीय संघाचे भविष्य म्हटले जात आहे.

कोण आहे तिलक वर्मा?
तिलक (Who Is Tilak Varma) हा मूळचा हैदराबादचा राहणारा. त्याचे पूर्ण नाव नम्बूरी ठाकूर तिलक वर्मा. तिलकचे वडील नम्बूरी नागराजू (Tilak Varma Father) हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते. ते आर्थिकदृष्ट्या इतका कमकुवत होते की त्यांना आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. तिलकचे वडील आपल्या मुलाला क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्याच्या स्थितीतही नव्हते, परंतु त्याचे प्रशिक्षक सलाम बैश यांनी त्याचा सर्व खर्च उचलला, ज्याच्या जोरावर तो आज या टप्प्यावर पोहोचला आहे.

तिलकला इथपर्यंत नेण्याचे श्रेय त्याचे प्रशिक्षक (Tilak Varma Coach) सलाम बैश यांना जाते. तिलकने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याचे प्रशिक्षक सलाम बैश यांनी त्याला कोचिंग व्यतिरिक्त गरज पडल्यास त्यांच्या घरी जेवण आणि राहण्यासाठी जागा दिली होती. तिलककडे राहण्यासाठी स्वत:चे घरही नाही. त्याचे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांने तो आपल्या कुटुंबाला घर विकत घेऊन देईल, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.