अभिमानास्पद क्षण! तिलक वर्माची धडाकेबाज खेळी प्रत्यक्षात पाहताना आई-वडिलांचा आनंद सातव्या आस्मानात – Video

बेंगलोर- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (MIvsRCB) संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमर झालेला आयपीएल २०२३ मधील पाचवा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात बेंगलोरच्या खेळाडूंनी मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांची अक्षरश: कोंडी केली. बेंगलोरने २२ चेंडू शिल्लक असताना ८ विकेट्सने मुंबईवर सोप्पा विजय मिळवला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्या मजबूत भागीदारीच्या जोरावर बेंगलोरने सतराव्या षटकातच ८ विकेट्स शिल्लक असताना सामना खिशात घातला.

जरी या सामन्यात मुंबईवर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली असली तरीही मुंबईच्या एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली. तिलक वर्मा (Tilak Varma) असे या खेळाडूचे नाव आहे. मुंबईची फलंदाजी फळी रुळावरुन घसरत असताना तिलकने धाडसी खेळी केली. २० वर्षीय तिलकने ४६ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीनंतर त्याला भारतीय संघाचे भविष्य म्हटले जात आहे.

हा सामना तिलकसाठीही सर्वार्थाने खास राहिला. कारण त्याची ही धडाकेबाज आणि अविस्मरणीय खेळी त्याच्या आई-वडिलांनी (Tilak Varma Family) प्रत्यक्षात अनुभवली. होय, तिलकच्या बेंगलोरविरुद्धच्या शानदार खेळीवेळी त्याचे वडील (Tilak Varma Father) नम्बूरी नागराजू आणि आई (Tilak Varma Mother) गायत्री देवी हे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित होते. तिलकच्या अर्धशतकानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मुंबई इंडियन्सने तिलकच्या आई-वडिलांचा व्हिडिओ शेअर केला आहे.