काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाईजान म्हटले पाहिजे; नवनीत राणांची घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर- नुकतीच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप, केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मात्र या जाहीर सभेला उपस्थित नव्हते. आता यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. अशातच अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत, अशी विचारणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली.