एमबीए शेतकऱ्यांची कमाल जिरेनियम शेतीतून मिळविले लाखोंचे उत्पन्न

शेती करणे हे अतिशय जोखमीचे समजले जाते, सध्याचा बाजारभाव पाहिला तर अनेकजण म्हणतात शेती म्हणजे जुगार. कारण अनेकदा काबाड कष्ट करून देखील हाती काहीच लागत नाही. पण औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील पवन जाधव या युवकाने मात्र पारंपारिक शेती पेक्षा वेगळा मार्ग निवडला आणि त्यात तो यशस्वी देखील झाला आहे, त्याने यातून तब्बल लाखों रुपये कमावले आहेत. पवन यांनी सुगंधी शेती म्हणजे जिरेनियमची लागवड केली आहे.

सर्वात प्रथम आपण जिरेनियम म्हणजे काय ते जाणून घेऊ – जिरेनियम या वनस्पतीच्या पानांतून तेल काढून ते लीटरवर विकले जाते. एका लीटरला हजारोमध्ये भाव मिळतो. या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर हे बनविण्यासाठी केला जातो.

पवन यांनी एमबीए केल्यानंतर कौटुंबिक व्यवसाय असलेली शेती करण्याचे ठरविले. त्यांच्याकडे 24 एकर शेती आहे. पवन त्यामध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पवन यांनी दोन वर्षांपूर्वी यूट्यूबवर जिरेनियम शेतीचा विडियो पहिला. त्यांनी स्वता लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तीन एकरात जिरेनियमची लागवड केली. लागवड करण्यासाठी एकरी एक लाख रुपये खर्च आला. यामध्ये लागवड,ड्रीप आणि खते यांचा समावेश आहे.

या पिकावर जास्त फवारणी देखील करावी लागत नाही. प्राणी देखील यांचे नुकसान करत नाहीत. पवन यांना पहिल्याच कापणीत अडीच लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. पवन सांगतात एक प्लॉट तीन वर्ष चालतो, एका वर्षात तीन कापण्या होतात. तीन वर्षात नऊ कापण्या होतात. पवन यांनी फक्त लागवडच केली नाही तर त्यांनी त्यांचा डिस्टीलेशन प्लांट देखील उभारला आहे. त्यासाठी अडीच लाख खर्च आला. एकूण खर्च जाऊन पवन आता लाखों रुपये कमावत आहेत.

डिस्टीलेशन करून मिळवलेले जिरेनियम तेल ते मुंबईत जाऊन एका कंपनीस विकतात. ही कंपनी लेखी करार करते त्यामुळे एक हमखास उत्पन्न मिळते असे पवन सांगतात. पवन सांगतात सर्व खर्च काढून मी वर्षाकाठी निव्वळ नफा अडीच लाख रुपये कमावत आहे ते देखील एकरी. म्हणजेच तीन एकरात मी 7.5 लाख रुपये कमावतो. पवन म्हणतात मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वताची नवीन वाट निर्माण केली की होतं. शेतीमध्ये तेच ते पीक घेऊन नफा मिळत नाही. असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे,. त्यामुळे परंपरागत शेती बरोबरच काहीतरी नवीन करायला हवे.

 

जिरेनियम शेतीचे फायदे
लागवडी करता माध्यम जमीन
एकदा लागवड केली की तीन वर्ष पीक मिळते.
तेलाचा भाव प्रती लीटर 12500
एकरी 40 टन पाला निघतो.
एकरी तीस ते चाळीस किलो तेल मिळते.कमी पाणी लागते .