महाराष्ट्रात आता रामराज्य आले… पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार – अमोल मिटकरी

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी व्हिडीओ संदेशात राजीनाम्याची घोषणा करताच भाजपच्या गोटात जल्लोष झाला.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या आमदारांनी एकमेकांचे तोंड गोड केले. आता महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राज्याभिषेक निश्चित झाला आहे. फडणवीस यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप आमदारांची बैठक घेतली. भाजपच्या सभेत मिठाई वाटली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य करत भाजपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात आता रामराज्य आले . भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार ! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार .काय ती झाडी काय तो डोंगार ? एकदम ओके सरकार असं म्हणत त्यांनी भाजपला टोले लगावले आहेत.