‘उद्धव ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर होता, पण असे घाणेरडे राजकारण करण्याची गरज नव्हती’

संभाजीनगर – शिवसेनेची हिंदुत्वावरून कोंडी करण्यासाठी पुढे केला जाणारा औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन शहरांचा नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. नामांतरामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातील चौकाचौकात बुधवारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

खडकी, फतेहनगर,औरंगाबाद व संभाजीनगर असे नामांतराचे टप्पे शहराने अनुभवले आहेत. दरम्यान नामांतर करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली होती. विभागीय आयुक्तांनी दोन शहराची नावे बदलण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांना विचारायचंय, हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा तोंडात लाडू टाकून बसला होतात का? आता येऊन दाखवा औरंगाबादला, मग दाखवू तुम्हाला. उद्धव ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर होता, पण जायची वेळ आली तर नीट जायचं ना, असे घाणेरडे राजकारण करण्याची गरज नव्हती.असा घणाघात त्यांनी केला.