लक्ष्मणराव इनामदार यांनी संघटना कार्यपद्धतीचा वस्तूपाठ घालून दिला – मोहन भागवत  

Mohan Bhagwat : लक्ष्मणराव इनामदार यांनी आपल्या वर्तनातून रा. स्व. संघाच्या संघटना कार्यपद्धतीचा आदर्श वस्तूपाठ समाजापुढे ठेवला, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. स्व. इनामदार यांच्या जीवनावरील सेतूबंध या मराठी रूपांतराच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक विमल केडिया या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजाभाऊ नेने यांनी लक्ष्मणराव इनामदार तथा वकीलसाहेब यांच्यावर गुजराती मध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे मराठी रूपांतर संजय इनामदार यांनी केले आहे.

भागवत म्हणाले की, रा. स्व. संघाच्या संघटन कौशल्याचा गाभा इनामदार यांनी आत्मसात केला होता. संघाचा विचार ज्यांना मुळापासून कळला अशा लोकांपैकी इनामदार एक होते. हा विचार स्वयंसेवकांनी आचरणात आणावा यासाठी ते आग्रही असत. त्यामुळेच गुजरातमधील संघाचे काम देशात अग्रस्थानी राहिले. कामातील उणिवा, त्रुटी कार्यकर्त्यांचे मन न दुखावता त्यांना सांगणे आणि त्यातून कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. या कार्यपद्धतीमुळेच असंख्य कार्यकर्ते घडले.

आजारपणाने गाठल्यावर शरीरात होणाऱ्या वेदना चेहऱ्यावर जाणवू न देता संघ कार्यात ते सक्रिय होते. जीवनाच्या सर्व क्षेत्रात संघ स्वयंसेवकांचे कर्तृत्व फुलावे यासाठी ते प्रयत्नशील असत. हे करत असताना संघाची मूल्ये जपली गेली पाहिजेत, दिशा चुकू नये याकडे त्यांचा कटाक्ष असे. यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या तेजोमयी स्वयंसिद्ध प्रतिबिंबा पैकी एक असे होते, अशा शब्दात  भागवत यांनी इनामदार यांचा गौरव केला.

यावेळी इनामदार यांचा सहवास लाभलेले श्री. केडिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मराठी रूपांतराला डॉ. अशोक कामत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रकाशक आनंद लिमये यांनी सूत्रसंचालन केले. हे पुस्तक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.