‘जे लोक सत्य बाहेर काढत आहेत त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जातं’

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर नवाब मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

ईडीच्या या कारवाई वरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठिक आहे. चौकशी होईल आम्ही वाट पाहतोय. नक्कीच संध्याकाळी ते घरी येतील. आताच माझं वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची. चौकशी पण कशी हे 20 वर्षांनी करत आहेत. 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण, 25 वर्षांपूर्वीचं प्रकरण.”

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.