‘पहाटे पाच वाजता उचलून नेतात, माणूस स्वतः जात नसतो’

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

ईडीच्या या कारवाई वरून आता भाजप नेत्यांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका करत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी यावरून आता नवाब मलिकांवर जोरदार प्रहार केला आहे. ‘पहाटे पाच वाजता उचलून नेतात, माणूस स्वतः जात नसतो’ असा घणाघात मोहित कंबोज यांनी केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.