केमिकल लोचा म्हणत उद्धव ठाकरेंची पुन्हा नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

मुंबई – शिवसेना (Shiv Sena) पक्ष फुटला तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंमुळेच असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) ‘झी-२४ तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ४० शिवसेना आमदारांचा गट मनसेत विलीन होणार असल्याच्या शक्यतांवर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन, असे राज ठाकरे म्हणाले होते.

यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले आहे.  शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उदघाटन कार्यक्रमावेळी बोलताना अप्रत्यक्ष टीका करत राज ठाकरे यांना फटकारले. अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. कारण आज जे कायदातज्ज्ञ सांगत आहेत. आधी दोन-तृतीयांश बहुमताचा नियम होता. पण आता तो राहिलेला नाही. जे फुटलेले आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीच पर्याय नाही. कालच एका पक्षानं त्यांना ऑफर दिली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  यानंतर शिवसैनिकांनी ‘केमिकल लोचा’ (Chemical locha) अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आता किती जणांचा केमिकल लोचा झाला असेल ते सांगता येत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.