होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

हिंजवडी येथे झालेल्या वादळी पावसात होर्डिंग्ज कोसळले. सुदैवाने येथे काही जिवितहानी झाली नाही. हे होर्डिंग्ज अधिकृत की अनधिकृत याबाबत महापालिकेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पुणे महापालिका हद्द आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी यापूर्वी होर्डिंग कोसळले आहेत. पुणे आणि परिसरात यापुर्वी होर्डिंग्ज कोसळून काही नागरीकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. हे लक्षात घेता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

पुणे महापालिका आणि परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. माध्यमांत याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचे दाखले त्यांनी दिले आहेत. अनेक हिर्डिंग धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले असून भविष्यात एखादी दुर्घटना येथे घडू शकते, अशी भीतीही खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.

या होर्डिंग्ज संदर्भात दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून घेऊन अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासंदर्भात सकारात्मक विचार करावा. तसेच होर्डिंग्ज अधिकृत असतील तर त्यांचे सुरक्षा ऑडीट करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.