जनाब संजय राऊत हे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले – गोपीचंद पडळकर

मुंबई : जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे. असा घणाघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

तर, जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का?की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. मा.शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत. असं देखील पडळकर म्हणाले आहेत.

काय आहे ठाकरे सरकारचा निर्णय ?

राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतुने राबविण्यात येत आहे. वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाईन उद्योगाची वाढ तसेच, वाईनचे परिणामकारक विपणन (Marketing) होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन उत्पादित करण्यात येते. ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल.

सध्या सूपर मार्केटशी संलग्न बीअर व वाईन विक्रीचा (नमूना एफएल/बीआर-II अनुज्ञप्ती ) परवाना देण्यात येतो. आता वाईन विक्रीसाठी पूरक म्हणून सूपर मार्केट किंवा वॉक-इन-स्टोअर मध्ये शेल्फ-इन-शॉप ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये (स्वतः स्वयंसेवेने खरेदी करण्याची सुविधा असलेले) कुलूपबंद करता येईल अशा कपाटामधून नमूना एफएल-एक्ससी परवानाधारकास, सीलबंद बाटलीमध्ये वाईनची विक्री करण्याकरिता नमूना ई-4 परवाना मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी किमान 100 चौ.मी क्षेत्रफळ असणाऱ्या आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 6 अन्वये नोंदणीकृत असलेलेच सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअर पात्र ठरणार आहेत. या ठिकाणी 2.25 घन मीटर इतके कमाल आकारमानाचे एकच कुलूपबंद कपाट ठेवता येणार आहे.

या निर्णयानुसार वाईन विक्री करणाऱ्या सूपर मार्केट आणि स्टोअर्सना देखील शैक्षणिक व धार्मिक स्थळांपासूनच्या अंतराचे निर्बंध लागू राहतील. नमूना ई-4 अनुज्ञप्तीचे 5 हजार इतके वार्षिक अनुज्ञप्ती शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, दारुबंदी लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार नाहीत.