टीएमसी आणि आयपॅक मतदारांचा डेटा गोळा करत असल्याने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची तक्रार

पणजी : तृणमूल आणि आयपॅक मतदारांची माहिती गोळा करून एक मोठा कट रचत असल्याचा आरोप करत, त्यांच्याकडे असलेला डेटा निवडणुक आयोगाने जप्त करावा अशी मागणी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने संयुक्तपणे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर आणि गोवा फॉरवर्डचे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांनी शनिवारी संयुक्तपणे पणजीत पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की ते टीएमसी आणि आयपॅकला मतदारांचा डेटा विकू देणार नाहीत.

सुनील कवठणकर म्हणाले की, टीएमसी आणि आयपॅक काही योजना सुरू करून मतदारांचा डेटा गोळा करत आहेत. “ज्या पद्धतीने ते लोकांची दिशाभूल करत आहेत आणि त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत त्यासाठी त्यांची चौकशी आवश्यक आहे.” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की टीएमसी घरोघरी जाऊन महिलांना कार्ड देत आहे आणि सत्तेवर आल्यावर त्यांना पैसे मिळतील असे सांगत आहे. “कार्ड देण्याची ही प्रक्रिया करत असताना, ते मतदारांचा सर्व वैयक्तिक डेटा गोळा करतात.” असे त्यांनी निदर्शनास आणले.

“टीएमसीचा दावा आहे की या योजनांसाठी सुमारे 3 लाख महिला आणि 2 लाखांपेक्षा जास्त तरुणांनी नावनोंदणी केली आहे. त्यांची ही प्रक्रिया फक्त 2022 च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर ते हा डेटा इतर कारणांसाठी वापरतील.’’ असे कवठणकर म्हणाले.

मतदारांच्या संमतीशिवाय डेटाचा गैरवापर करणे कायद्याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी माहिती दिली की टीएमसीने आयपॅकला निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे काम दिले आहे. “टीएमसी वैयक्तिक डेटा गोळा करत आहे आणि मतदारांच्या संमतीशिवाय तो आयपॅकला देत आहे.” असे ते म्हणाले.

“टीएमसी गोव्याला प्रयोगशाळा म्हणून वापरत आहे आणि भाजपला सत्तेत येण्यासाठी मदत करत आहे. टीएमसी एकही जागा जिंकणार नाही, ते मतांचे विभाजन करण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी येथे आहेत.” असे ते म्हणाले.

याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे दुर्गादास कामत यांनी सांगितले. “आम्ही टीएमसी आणि आयपॅकला गोव्यातील मतदारांचा डेटा विकू देणार नाही.” असे कामत म्हणाले.

“आयपॅकचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्हीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ते एका मॉडेलचे अनुसरण करत आहेत जे तृणमूल आणि आयपॅक साठी डेटा गोळा करत आहे. राष्ट्रीय स्तरावर पक्ष न्यायचा असेल तर त्यांना हे करावे लागेल.” अशी माहिती कामत यांनी दिली.

“याचा अर्थ असा आहे की गोव्यातील महिला आणि तरुणांकडून योजनांच्या नावावर गोळा केलेला डेटा योजनेशिवाय इतर कारणांसाठी वापरला जातो.” असे ते म्हणाले.

काँग्रेस व गोवा फॉरवर्डने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि टीएमसी आणि आयपॅक द्वारे गोळा केलेला सर्व डेटा त्वरित जप्त करण्याची मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे.