देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही : नाना पटोले

मुंबई – राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाजपा (BJP) सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्याचा पक्षाला फायदा होणार आहे यासाठी भाजपाचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प आजच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, AICC चे सचिव सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार, खा. कुमार केतकर, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खासदार, हुसेन दलवाई, डाॅ. भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ नेते उल्हास पवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, ठाणे शहर प्रभारी शरद आहेर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, दयानंद चोरगे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, राज्यातील यापुढचा कालखंड निवडणुकीचा असून त्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली. यात ज्वलंत मुद्यांना आवाज उठवला गेला. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत केलेले मोदी-अदानी संबंध काय असा प्रश्न विचारला. पण त्यानंतर मोदी सरकारने राहुल गांधी यांना संसदेत बोलूच दिले नाही, त्यांची मुस्कटदाबी केली. राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेची भाजपाला भिती वाटते म्हणूनच ही मुस्कटदाबी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेसला चांगले दिवस आहेत पुन्हा पक्षाला सोनियाचे दिवस येतील.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आणि मोदी अदानी संबंध काय असा प्रश्न विचारताच मोदी सरकारने राहुल गांधींवर आकसाने कारवाई केली. हा प्रश्न एकट्या राहुल गांधी यांचा नाही तर सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला असे म्हटले तर त योग्यच आहेत. राहुल गांधींना दोषी ठरवण्यामागचा घटनाक्रम नीट पहा, हे सर्व जाणीवपूर्वक, सुडबुद्धीने केलेले षडयंत्र आहे हे दिसते.

राज्यातील शिंदे सरकार आल्यापासून अंधाधुंद कारभार सुरु आहे. हे सरकार केवळ जोरदार घोषणाबाजी करते, त्यावर करोडो रुपये खर्च करते. शिंदे सरकार बेभान सरकार आहे. गारपिट झाली, शेतकरी संकटात असताना त्यांना मदत देण्याऐवजी वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री व शिंदे सरकार अयोध्येत देवदर्शनाला गेले. हे कसले रामराज्य? असा प्रश्न विचारला.