‘हजारो अनाथांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असून ती पुन्हा अनाथ झाली’

मुंबई : अनाथांची आई म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.

आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली आहे. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असून ती पुन्हा अनाथ झाली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, हजारो अनाथांची माय असणा-या सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत खडतर होते. अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जात संघर्ष करत त्यांनी हजारो अनाथांना मातृछत्र दिले. अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करत अनाथ मुलांचा आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांनी सांभाळ केला.

त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन तर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सिधुंताईच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.