Nana Patole | राज्यातील लोकसभा निवडणूका संपल्या, सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे

Nana Patole | संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. धरणातील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जनावरांना चारा उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी आचारसंहिता शिथिल करुन तातडीने पिण्याचे पाणी व जनावरांना चारा मिळेल यासाठी सरकारने निर्णय घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी माता भगिनी भर उन्हात वणवण करत आहेत. जनावरांना चारा नाही. अनेक शहरात दहा बारा दिवसातून एकदा पाणी येते, राज्यातील २३ जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याचे समजते, मराठवाड्यातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे. चारा नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलावीत हे आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितले होते. पण राज्यातील भाजपा-शिंदे-अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोड्या व दुसरे पक्ष फोडणे यातच व्यस्त असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले आता राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे. राज्य सरकारने तातडीने पाणी व चाऱ्याची सोय करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप