राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करताच संजय राऊत म्हणाले,…

Mumbai – वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी बनले आहेत. एकिकडे छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) अडचणीत आल्याचे चित्र असताना आता खुद्द भगतसिंह कोश्यारी यांनाच आता महाराष्ट्रातलं (Maharashtra Governor) हे पद नकोय, अशी माहिती समोर आली आहे.

कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याचे वृत्त आज माध्यमांनी चालवले आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

दरम्यान,  हे वृत्त येताच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढूच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.