राष्ट्रवादी काँग्रेस, कामगार संघटनेचे चक्री उपोषण मागे; कटारे यांनी कामगारांच्या मागण्या केल्या मान्य

तुळजापूर-– तालुक्यातील तामलवाडी येथील कटारे स्पिनिंग मिलसमोर मागील सात दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष शिवाजी सावंत, कामगार संघटना अध्यक्ष शाहीर गायकवाड, कामगार संघटना पतसंस्था सचिव सतीश माळी यांच्या नेतृत्वात चक्री उपोषण सुरू होते. दरम्यान, आज दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनी मालक किशोर कटारे यांच्याशी सकारात्मक चर्चा होवून आणि त्यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

दि. 06 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कटारे मिल कामगार संघटना व कामगार पतसंस्थेच्या वतीने कामगारांच्या ग्रॅज्युएटीच्या देय रकमांसाठी चक्री उपोषण सुरू होते. दरम्यान, या पदाधिकार्‍यांनी 7 दिवस मालकांची वाट पाहून शेवटी आक्रमक पवित्रा घेत कामगारांनी 12 फेब्रुवारी 2023 रोजी सार्वजनिक आत्मदहन करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व कामगार कल्याण अधिकार्‍यांना दिले होते.

दरम्यान, याची दखल मालकांनी घेवून दुपारी 3 वा. उपोषणकर्त्यांना बैठकीसाठी बोलविले. या बैठकीत कटारे यांनी राष्ट्रवादीचे सावंत आणि कामगार प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले आणि देणी देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. माझी कंपनी बंद पडली असली तरी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या जुन्या कामगारांचा 1 रूपया कटारे परिवार ठेवणार नाही, असा विश्‍वास कामगारांना दिला. यासाठी त्यांनी 3 ते 4 महिने कालावधी मागितला. यावेळी उपोषणकर्त्यांनीही त्यांना होकार दिला आणि कटारे परिवाराच्या विश्‍वासार्हतेवर आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ही सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी सोलापूर दै. तरुण भारतचे वरिष्ठ उपसंपादक अविनाश गायकवाड, तामलवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन पंडित, समाजसेवक डॉ. रविराज गायकवाड, शिवसेना माजी विभागप्रमुख मुकुंद गायकवाड यांनी परिश्रम घेतले. हे कंपनीसमोरचे चक्री उपोषण मागे घेण्यात आल्याने पुढील सार्वजनिक आत्मदहनाचे आंदोलन रद्द करण्यात आले. केलेल्या आंदोलनास यश आल्यामुळे कामगारांत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी शेवटी शिवाजी सावंत यांनी कामगारांच्या सहकार्याबद्दल व सर्व मध्यस्थींचे आभार मानले.

अभिलेखे तपासून लवकरच देणी देणार: कटारे

बैठकीत सकारात्मक चर्चा केल्यानंतर कंपनी मालक किशोर कटारे यांनी सर्व कटारे स्पिनिंग मिलच्या कामगारांची उपदानाची / ग्रॅज्युटी रक्कम सर्व अभिलेखे तपासून आज दि.07 फेब्रुवारी 2023 पासून 04 (चार) महिन्यात एक रक्कमी देतो, असे मान्य केल्याने कामगारांचा आनंद द्विगुणीत झाला.

जिल्हाधिकारी ओंबासे यांनीही केले सर्वांचे अभिनंदन

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर कटारे स्पिनिंग मिल जवळपास 30 वर्षांपासून डौलाने उभी आहे. या कंपनीतून रोजगार निर्मिती होत असल्याने ती चांगल्या पध्दतीने चालणे गरजेचे आहे. त्या कंपनीसमोर आंदोलन होत असल्याची चर्चा निवेदनाद्वारे समोर आली होती मात्र कामगार आणि मालकांनी सकारात्मक चर्चा करून हे आंदोलन गाव स्तरावर मिटविल्याने सर्वांचे प्रथमत: अभिनंदन करतो. भविष्यात हा उद्योग टिकण्यासाठी जिल्हास्तरावर योग्य ते सहकार्य करू. – सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव.