कॉंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला; जाणून घ्या नेमका कुणी केला हल्ला

कळमनुरी : काँग्रेसच्या विधान परिषदेच्या सदस्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव (MLA Dr. Pragya Rajiv Satav) यांच्यावर बुधवारी रात्री साडे आठ वाजता कसबे धावंडा गावात एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार,दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने गावात मार्गदर्शन करत असताना आमदार सातव यांना मागे ओढून चापट मारली.(Attack on Congress MLA Pragya Satav)

डॉ. प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुकवर व ट्विटरवर या हल्ल्याची माहिती दिली आहे. आपल्या जिवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करीत राहणार असल्याचे त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात स्पष्ट केले आहे.

कळमनुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने गावात जाऊन महेंद्र डोंगरदिवे यास ताब्यात घेतले आहे. त्याचे विरुद्ध आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र डोंगरदिवे हा नशेत होता, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (Superintendent of Police G. Shridhar) यांनी सांगितले.