फडणवीसांना माहितीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मारामाऱ्या होतील, अमोल मिटकरींचा दावा

इंदापूर: महाराष्ट्राच्या सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारपुढे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास हे सरकार कोसळेल, मारामारी होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात खाती देण्यात आल्याचा अर्थ मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.अमोल मिटकरी हे इंदापूरमध्ये शरद कृषी महोत्सवात बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकारला आवाहन देत अमोल मिटकरी म्हणाले की, “अधिवेशनाच्या तोंडावर तात्पुरत्या स्वरूपात आपली खाती इतरांकडे सोपवली, याचा अर्थ स्पष्ट आहे की मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सरकारमध्ये हिंमत असेल तर जानेवारी महिन्यात तरी मंत्रिमंडळ विस्तार करून दाखवावा. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मारामारी होईल हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत असल्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. खंडपीठाचा निर्णय ज्यावेळी होईल, त्यावेळी या सरकारमधील आमदार अपात्र ठरतील.”

दरम्यान राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा होती. परंतु सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.