आंबेडकरांवर आरोप करणाऱ्या संतोष बांगरला लवकरच घोडा लावू  – वंचित 

हिंगोली – आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य  करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी एक हजार कोटी रुपये घेऊन हेलिकॉप्टरने  प्रचार केला. याचा फायदा भाजपला झाला. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप संतोष बांगर यांना शिवसंपर्क मेळाव्यात केला.

ते म्हणाले,  गेल्या निवडणुकीत प्रचारासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. कुठून हे हेलिकॉप्टर आले हे सुद्धा लोकांना सांगावे लागणार आहे. भाजपने मत विभाजित करण्यासाठी एमआयएमला पुढं केले. गेल्या निवडणुकीत आंबेडकरांच्या वंचितचाही त्यासाठीच वापर केला गेला. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट बांगरांनी यावेळी केला.

आंबेडकर हे आपल्या बौद्ध समाजाला ताकद दाखवायची म्हणाले होते. ते कुणाच्या भरोशावर?, म्हणाले होते, असा सवालही बांगरांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण आता तापू लागले असून वंचितकडून देखील बांगर यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

वंचित वर बालीश आरोप करणारा शिवसेनेचा पाचवी शिकलेल्या अडाणी अल्पशिक्षित आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) ह्याला प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करा. त्याला अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करून द्या. त्याला साक्षर करण्याचा निर्धार युवा आघाडीने केला आहे. बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आला आहे. लवकरच ‘बांगरला घोडा लावू’ असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव आणि मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष बांगर या आमदाराने अकलेचे तारे तोडले. 1 हजार कोटी रुपयांचा हास्यास्पद व बालीश आरोप केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडाणी बांगरला आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून त्याला एक हजारावरील शून्य वाचण्याची अक्कल आली पाहिजे.  राज्यात जिथे बांगर दिसेल तिथे त्याला घोडे लावण्याचे आदेश युवा कार्यकर्त्यांना दिले आहेत. बांगरने केलेले आरोप त्याने सिद्ध करावे. किंवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा बांगरला नांगर लावूच असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. आमदार बांगर ह्याने दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे. याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागतील.