आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर…; संभाजी भगत यांची रोखठोक भूमिका

Mumbai – नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावाविषयी (Gautami Patil Surname) नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे गौतमीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या मुद्द्याला काहीजण समर्थन करत आहेत तर काहीजण विरोध करत आहेत. शाहीर संभाजी भगत (Shaheer Sambhaji Bhagat) यांनीही या वादात आता उडी घेतली असून एक भलीमोठी पोस्ट त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. यात ते म्हणतात, नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ….ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे …नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??

 

 

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !! असं भगत यांनी म्हटले आहे.