नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली अमित शाह यांची भेट

मुंबई – भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी आज नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन दोघांचेही आभार मानले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुक लक्षात घेऊन आमदार अँड आशिष शेलार यांना पुन्हा तिसऱ्यांंदा पक्षाने मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. काल याबाबत घोषणा पक्षाने केली. त्यानंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईचा महापौर आमचाच  होईल अशी घोषणा करुन मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान नियुक्ती नंतर त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. तर आज त्यांनी नवी दिल्लीला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबद्दल त्यांनी म्हटले आहे की, पक्ष संघटनेचे काम करता आम्हाला सदैव मार्गदर्शन, दिशा आणि आशिर्वाद देणारे देशाचे गृहमंत्री  अमितभाई शाह यांची नवी दिल्ली येथे आज भेट घेतली. मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन दाखवलेल्या विश्वासाबाबत त्यांचे मनापासून आभार मानले, अशा भावना व्यक्त केली आहे.