आयपीएल लिलावात कोट्यधीश बनलेला विवरांत शर्मा आहे कोण? क्रिकेटमधील कामगिरी राहिलीय कौतुकास्पद

IPL 2023 : आयपीएल २०२३च्या अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावात विवरांत शर्मा या नावाची सर्वाधिक चर्चा झाली. अष्टपैलू विवरांत शर्माला (Vivrant Sharma) विकत घेण्यासाठी सनरायझर्स हैदाराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झुंज पाहायला मिळाली. अखेर या लढतीत हैदराबादचा संघ सरस ठरला. केवळ २० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या विवरांत शर्माला हैदराबाद संघाने २ कोटी ६० लाखांना विकत घेतले. ही बोली नक्कीच विवरांतला अचंबित करणारी ठरली.

जम्मू-काश्मीरमधील २३ वर्षांच्या विवरांत शर्माने अलीकडच्या काळात अप्रतिम खेळ दाखवला आहे. त्यामुळे लिलावात त्याच्यावर फ्रँचायझींची नजर असणे साहजिक होते. लिलावात मोठी बोलू लागल्यानंतर कोट्यधीश बनलेल्या या विवरांत शर्माकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तो नक्की आहे कोण? त्याची क्रिकेटमधील कामगिरी कशी राहिलीय? हे पाहूया…

कोण आहे विवरांत शर्मा?(Who is Vivarant Sharma?).
२३ वर्षीय विवरांत शर्मा डाव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करतो. त्याने २०२१मध्ये देशांतर्गत पदार्पण केले आणि आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटचे तिन्ही स्वरूप खेळले आहेत. विवरांतने आतापर्यंत खेळलेल्या नऊ टी-२० सामन्यांमध्ये १२८.१८च्या स्ट्राइक रेटने १९१ धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत, त्याने तीन डावात सहा विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये १३ धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

विवरांतने १४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ५१९ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये २२ धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ७६ धावा केल्या आहेत आणि एक विकेट घेतली आहे.