मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले – फडणवीस

Mumbai – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

दरम्यान, मेटे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करतो.

अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला.

तळागाळातील विषयांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे. गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.