विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू, डॉक्टरांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Mumbai – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात मेटे जखमी झाले. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयच्या वरिष्ठ डॉक्टरांनी महत्त्वाची आणि मोठी माहिती माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, विनायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यावेळी त्याना तपासण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. याचाच अर्थ विनायक मेटे यांची नाडी तपासली असता नाडीदर शून्य होता. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी ना पल्स, ना बिपी, ना हार्टबिट अशा गंभीर अवस्थेत ते आढळून आले होते. त्यामुळे तेव्हा त्यांना तपासण्यात आलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे रुग्णालयात जेव्हा मेटे यांना आणण्यात आलं होतं, तेव्हा ते मृतावस्थेतच होते, अशी शंका आहे. दरम्यान, ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला होता का, यावर आता भाष्य करता येणार नाही, असंही डॉक्टरांनी म्हटलंय. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर याबाबत सविस्तर बोलता असं, एमजीएम रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.