‘स्वतः तात्पुरते बाहेर आहेत ते अजित पवार कुठल्या तोंडाने मलिकच्या समर्थनात आंदोलन करत आहेत?’

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर आता भाजप नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपनेते निलेश राणे यांनी आंदोलन करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. कुठल्या तोंडाने अजित पवार नवाब मलिक च्या समर्थनात आंदोलन करत आहेत?? स्वतः तात्पुरते बाहेर आहेत असं म्हणत खोचक टीका राणे यांनी केली आहे.

 

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे. यांना सरकारला टिकवायचे आहे हीच यांची भावना आहे. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा राजीनामा घेऊ शकत नाही. कारण, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर यांचे सरकार आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला आणि राष्ट्रवादीने पाठबळ काढलं तर, म्हणून ‘तेरी बी चूप मेरी भी चूप’ असे सुरु आहे, अशी टीका दरेकरांनी केली आहे.