‘राज्य सरकार कोसळणार, राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी एक मोठा दावा केला आहे. राज्य सरकार लवकरच कोसळणार असून राज्यात राष्ट्रपती शासन लागणार असल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांची फाईल तयार असून लवकरच त्यांना ईडी अटक करेल असे देखील नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे. यांना सरकारला टिकवायचे आहे हीच यांची भावना आहे. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा राजीनामा घेऊ शकत नाही. कारण, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर यांचे सरकार आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला आणि राष्ट्रवादीने पाठबळ काढलं तर, म्हणून ‘तेरी बी चूप मेरी भी चूप’ असे सुरु आहे अशी टीका विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांनी केली आहे.