नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने शिवसेना कार्यकर्ते संतोष परब Shivsainik Santosh Parab) हल्ल्याप्रकरणी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कणकवली न्यायालयातच जामीनाचा अर्ज दाखल केला आहे.

विशेष म्हणजे नितेश राणे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती करण्यात आली. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात यावे. याच आधारे जामीन मिळावा, अशी मागणी नितेश राणे यांनी जामीन अर्जात केली. त्यामुळे नितेश राणे यांनी जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे त्यासाठी कारागृह अधिक्षकांनादेखील अर्ज करण्यात आला. पण कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्याच सुनावणी होईल. नितेश यांना आजची रात्र देखील जेलमध्ये काढावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे. आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी व्यायालयात हजर केलं गेलं. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं.