बांगलादेशला ५ विकेट्सने हरवत पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक, भारताचेही तिकीट पक्के

Semi Finals: टी२० विश्वचषक २०२२ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (०६ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाच्या साखळी फेरीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची लढत झाली. ऍडलेड येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण लढतीत बाबर आझमच्या पाकिस्तान संघाने ५ विकेट्सने बाजी मारली आणि ब गटातून उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. तर बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित २० षटकात ८ बाद १२७ धावा केल्या. बांगलादेशकडून सलामीवीर जनमुल सान्तो याची बॅट चांगलीच तळपली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या मदतीने ५४ धावांची संथ पण उपयुक्त अशी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त बांगलादेशचा एकही फलंदाज २५ धावांचा आकडा गाठू शकला नाही.

या डावात पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदीच्या वेगवान चेंडूने फलंदाजांचा चांगलाच घाम काढला. त्याने आपल्या ४ षटकांचा कोटा पूर्ण करताना २२ धावा देत ४ विकेट्स काढल्या. तर शादाब खाननेही बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनची (शून्य धावा) अतिशय महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. शादाबने २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानने बांगलादेशच्या १२८ धावांच्या आव्हानाला सहजरित्या पूर्ण केले. यष्टीरक्षक व सलामीवीर मोहम्मद रिझवानने ३२, मोहम्मद हॅरीसने ३१, कर्णधार बाबर आझमने २५ आणि शान मसूदने २४ धावा काढल्या. अशाप्रकारे सांघिक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने १८.१ षटकातच सामना खिशात घातला.

या विजयासह पाकिस्तानच्या खात्यात ६ गुण जमा झाले असून सर्वाधिक १.०२८ नेट रन रेटसह आझमचा संघ टेबल टॉपरही बनला आहे. त्यांनी साखळी फेरीतील ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघही उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनणे जवळपास निश्चित आहे. त्यांच्या खात्यात सध्या ६ गुण आहेत. रोहित शर्माच्या संघाने झिम्ब्बावेविरुद्धचा शेवटचा साखळी फेरी सामना गमावला तरीही ते ६ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील.