नागपूरात पहिल्यांदाच होणार पेटेन्ट फेस्टीवल, चांगल्या कल्पनांची लाखोंची बक्षिसे

Nagpur – मोठ्या कल्पना नेहमी छोट्या ठिकाणी जन्म घेतात. त्यांना योग्य दिशा मिळाली, प्रोत्साहन मिळाले की त्या छोट्या कल्पनेचे संशोधनात रुपांतर होते. तरुणांच्या मनांमध्ये तर त्या कायम घोळत असतात. त्यांना व्यासपीठ मिळत नाही म्हणून त्या मनात घोळतात आणि मनातच विरतात. आता तसे होणार नाही. तुम्ही कल्पक असाल, सर्जनशील असाल तर व्हिजन नेक्स्ट ने तुमच्यासाठी खूप मोठी संधी आणली. ही एवढी मोठी संधी आहे की तुम्ही एका रात्रीत स्टार व्हाल आणि देशभर चमकाल.

युवापिढीत दडलेल्या तरुण प्रतिभावान नायकांसाठी आणि ज्याच्या डोक्यात भन्नाट आयडीयांचे चक्र सतत सुरु राहते अशा नागपुरी फुलसुंग वांगडू साठी व्हिजन नेक्स्ट सर्जनशील कल्पनांचा उत्सव साजरा करणार आहे. मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रेरणेतून हा पेटेंट फेस्टिव्हल साजरा होणार आहे, अशी माहिती माजी महापौर व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत डॉ योगिता कस्तुरे, मनोज चव्हाण, विनय चावला उपस्थित होते.

आपल्या डोक्यात कल्पना येतात, त्याला दिशा मिळत नाही हे प्रत्येकाचेच दुःख असते. आपण त्या मित्रमंडळीत सांगतो आणि विसरून जातो. त्याचा पाठपुरावा आपणास शक्य होत नाही. त्याचे पेटेंट करणे म्हणजे तर खूपच दूरची गोष्ट. आता तसे होणार नाही. विदर्भातील मंडळी मागे राहणार नाही.
काय आहे पेटेंट फेस्टिवल ?

पेटेंट फेस्टीवल ही कल्पक आणि सर्जनशील तरुणाईसाठीची संधी आहे. ज्यां तरुणांच्या डोक्यात काही कल्पना आहेत. त्या देशहिताच्या आहेत, समाजहिताच्या आहेत अथवा त्यांचा काही तरी उपयोग होऊ शकतो. त्या कुणाला तरी कामी येऊ शकतात अशा कल्पक लोकांनी आपली कल्पना आम्हाला पाठवायची. ज्या कुणाचे संशोधन पेटेंटच्या मार्गावर आहे, किंवा पेटेंट मिळाले आहेत ते सुध्दा आपली कल्पना आम्हाला पाठवू शकतात.
कल्पनांचे होणार काय ? आमच्याकडे आलेल्या कल्पना आम्ही तज्ज्ञांकडे पाठवू, ज्यांच्या कल्पना आहेत त्यांना आणि ती कल्पना ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकमेकांशी बोलण्याची संधी उपलब्ध करुन देऊ. आलेल्या कल्पनापैकी निवडक कल्पनांना पाच लाख रुपयांची बक्षीसे सुध्दा देऊ.

कल्पना पेटेंटच्या दर्जाची असेल तर तसे मार्गदर्शनही मिळेल. सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र मिळेल. ज्या कॉलेजमधून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतील अशा पाच कॉलेजचा सन्मान होईल.

कुठे करायची नोंदणी ?
या संदर्भातील जनजागृती मोहीम सुरू झाली असून आणि नागपुरातील १०० + शैक्षणिक परिसरांमध्ये ती राबविली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक patentfest.com वर नोंदणी करू शकतात. शेवटची तारीख आहे ५ ऑगस्ट २०२३.

१४ ऑगस्टला होणार महोत्सव
आलेल्या सगळ्या कल्पनांची छाननी करून ८ आणि १० ऑगस्ट रोजी उपांत्य स्पर्धा रंगणार आहे. त्यातून समोर आलेल्या कल्पनांचा महामहोत्सव १४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सुरेश भट सभागृहात होणार आहे. तेव्हा सज्ज व्हा. आपला मोबाईल हातात घ्या आणि डोक्यातली कल्पना आम्हाला पाठवा. राज्यातील पहिल्या वहिल्या पेटेंट फेस्टीवलचा भाग व्हा.