भाजपने विधानसभेच्या किती जागा लढणार याचे आकडेच जाहीर केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीची पंचाईत झाली

Mumbai  : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक लक्ष्यवेधी घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या आमदारांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ८० ते ८५ जागा लढविण्याचा दावा केला होता. तर, आता सरकारमध्ये सामील झालेले  अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ९० जागा लढविण्याचाही दावा केला होता. मात्र, भाजपने विधानसभेच्या किती जागा लढणार याचे आकडेच जाहीर केल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाची पंचाईत झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १५२ हून अधिक तर महायुतीच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचे तर लोकसभेसाठी महायुतीच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक महाअभियान बैठकीत जाहीर केले आहे. भाजपच्या विधानसभेत बहुमताहून अधिक जागांचे उद्दिष्ट हे शिंदे – पवार गटासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.

सध्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाकडून फडणवीसांनी १५२चा आकडा जाहीर केला आहे. अजित पवारांनी ९० चा आकडा सांगितला आहे. विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २८८ आहे. त्यामुळे या दोघांच्या जागांची बेरीज केली तर ती संख्या २४२ इतकी होते. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या वाट्याला अवघ्या ४६ जागा उरतात. त्यामुळे नेमकं या तीन नेत्यांमध्ये युती करताना काय ठरलं आहे? किती जागांचा फॉर्म्युला ठरला आहे? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काही जाणकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार लोकसभा निवडणूक हेच भाजपचे मुख्य लक्ष्य असून राज्यातील निवडणुका हे भाजपसाठी नंतरचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे लोकसभेतील परफॉर्मन्स हाच भाजपसाठी महत्वाचा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत जर भाजपला मित्र पक्षांनी मनापासून साथ दिली आणि विजय मिळवला तर भाजपला राज्यातील निवडणुकीत थोडी त्यागाची भूमिका घ्यावी लागू शकते. दुसऱ्या शक्यतेनुसार जर लोकसभा निवडणुकीत उन्नीस-बीस झाले तर मात्र भाजप राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पर्यायांचा अवलंब करेल असं सांगण्यात येत आहे.