मोदींनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेची ऑफर दिल्याच्या पवारांचा दावा

मुंबई – महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेसोबतची युती तुटल्याने त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीच्या एका वर्गाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी, अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथही दिली, पण ही व्यवस्था काही तास टिकली नाही. अखेर शिवसेनेने छावण्या बदलून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.

मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार यांनी एका कार्यक्रमात एक अजब दावा केला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती असं सांगितलं.

पवार म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. त्यांनी तसा प्रस्तावही दिला होता. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नसल्याचे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले. पण तरीही तुम्ही विचार करा, असे मोदी यांनी सांगितले.

राज्यात आमचेही (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) काही जमत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे हा विचार भाजपा नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल, ही गोष्ट पवार यांनी प्रथमच या कार्यक्रमामध्ये जाहीर केली.