मोदींनी कोरोना काळात टाळ्या-थाळ्या वाजवायला का लावल्या?रामाचा उल्लेख करत मराठी कलाकाराने सांगितले कारण

Rahul Solapurkar :  कोरोना काळात डॉक्टर, पोलीस यांच्यासह सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिवे लावायला तसेच घंटा आणि टाळ्या थाळ्या वाजवायला सांगितले होते. मात्र आता अभिनेते राहुल सोलापूरकर या मराठी कलाकाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ७५ हजार पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले. भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेले भाषण चर्चेत आहे.

ते म्हणाले, २५ मार्च २०२० रोजी गुढीपाडवा होता. कोरोनाच्या विरोधात भारत एक होतोय हे दाखवण्यासाठी या दिवशी मोदींनी घरात दिवे लावण्याचे तसेच झांजा, थाळ्या,घंटा आणि टाळ्या वाजवायला सांगितल्या. ज्यांचा देव धर्मावर देखील विश्वास नाही अशांनी देखील त्या दिवशी टाळ्या वाजवल्या. मात्र यामागचे खरे कारण हे होते की अस्थायी मंदिरात रामलला नेण्याचा दुर्दैवाने तो मुहूर्त होता .

कोरोना काळ होता आणि मग करायचं काय ? मग योगी आदित्यनाथांनी मोदींना विचारलं की रामलला असा सुखा-सुखा कसा जाणार ? रामाची मोठी मिरवणूक निघायला पाहिजे. गर्दी करायला परवानगी नाही. सगळा भारत बंद केलाय आम्ही करायचं काय ? यावर पंतप्रधान म्हणाले, काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. यानंतर सकाळी ३ सिक्युरिटी गार्ड , पाच महंत यांना सोबत घेवून योगींनी एक पूर्णांक तीन किलोमीटर चालत रामाची मूर्ती डोक्यावर घेत अस्थायी मंदिरात ठेवली आणि त्यावेळी संपूर्ण भारत घंटा,टाळ्या, थाळ्या आणि झांजा वाजवत होता. असा दावा सोलापूरकर यांनी केला आहे.