…अन्यथा राज्यात सत्तांतर निश्चित आहे ही बाब देखील महाविकास आघाडीला लक्षात घ्यावीच लागेल

 प्रफुल्ल पाटील – भारतीय राज्यघटनेच्या ( Indian Constitution) कलम क्रमांक ८० नुसार राज्यसभा अर्थात अप्पर हाऊस आणि कलम ८१ नुसार लोकसभा (Loksabha) अर्थात लोवर हाऊसची निर्मिती झालेली आहे.तसं पाहता लोकांचं थेट रीप्रेझेंटेशन करणारी बॉडी म्हणून लोकसभेला विशेष महत्व प्राप्त आहेच.सोबतच फक्त लोकसभेलाच काही विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे.(उदा. धनविधेयक इ.).म्हणून याचा अर्थ राज्यसभेला दुय्यम दर्जा आहे का ? तर तसं अजिबात नाही.राज्यसभेला देखील काही एक्सक्लुझीव्ह अधिकार आहेतच.(अखिल भारतीय सेवेची निर्मिती इ.) तसेच फक्त धनविधेयक वगळता इतर कुठल्याही विधेयकाला कायद्याचे स्वरूप मिळवून द्यायचे असेल तर राज्यसभा देखील लोकसभेइतकीच महत्त्वाची आहे.म्हणून देशाच्या सत्ताकारणात जर एकहाती हुकूमत गाजवायची असेल तर दोन्ही सभागृहात आपली जास्तीत – जास्त सदस्य संख्या कशी राहील यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील असतो. खासकरून दिल्लीतला सत्ताधारी पक्षतरी तसा प्रयत्न सुरूच ठेवतो.

सहा वर्ष सदस्यांच्या कार्यकाळ असणारे आणि २५० सदस्य संख्या असणारे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.म्हणजे ते कधीही विसर्जित होत नाही.(लोकसभा दर ५ वर्षानी विसर्जित होते.आणिबाणी काळ (Emergency period) अपवाद) पण दर दोन वर्षानी १/३ सदस्य निवृत्त होतात.सोबतच कला, विज्ञान,वाडमय,समाजसेवा (Art, Science, Wadmay, Social Service) आदी विषयातले मान्यवर ज्यांच्या अनुभवाचा देशाच्या पॉलिसी मेकिंग (Policy making) कामी फायदा घेता येऊ शकतो अशा १२ मान्यवरांना राष्ट्रपती (President) मनोनित किंवा नामनिर्देशित करतात. याबरोबरच लोकसभेने घाई – घाईत पास केलेले कायदे अभ्यासुन त्यावर साधक बाधक चर्चा व्हावी यासाठी देखील राज्यसभा मोलाची भूमिका बजावत असते असं राज्यसभेचा आजवरचा इतिहास सांगतो.राज्यसभा विषयावर लिहिताना नमनाला घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच्याच चर्चेच्या स्थानी असलेली ही राज्यसभा निवडणुक(Rajya Sabha elections) .

महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत.तर सर्वाधिक ३१ जागा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या राज्याच्या वाट्याला आहेत. लोकसभेपेक्षा अभ्यासपूर्ण भाषणांची राज्यसभेची पूर्वापार ओळख आहे.त्यामुळे जेष्ठ आणि अभ्यासू लोकं राज्यसभेवर जावेत असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असायचा.पण भारतीय राजकारणात देखील थिंक टँकची (Think Tank) मदत घेऊन आऊटसोर्सिंग (Outsource) व्हायला सुरवात झाली आणि प्रत्येक निवडणुक फक्त पक्षीय दृष्टीने कशी फायद्याची या दिशेने प्रत्येक पक्ष पाहू लागला.परिणामी राज्यसभा निवडणुकीचा स्तर देखील घसरला हे आपण गेली काही दिवस बघतोच आहोत.खरं तर १९९८ पासून राज्यात बिनविरोध राज्यसभा सदस्य निवडून दिले जात होते.त्यावेळी देखील निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकारण वैगरे घडत होतं पण ते दुर्लक्ष करता येण्याजोग होतं.पण यंदा जे घडलं ते निश्चितच सर्वार्थाने वेगळं होतं.

पियूष गोयल,विकास महात्मे, पी.चिंदबरम,संजय राऊत,प्रफुल्ल पटेल (Piyush Goyal, Vikas Mahatme, P. Chindabaram, Sanjay Raut, Praful Patel) आदी लोकं सहा वर्षाची टर्म संपून रिटायर्ड झालेत.राज्यात सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली. सताधारी महाविकास आघाडीतल्या (MVA) काँगेस,राष्ट्रवादी आणि सेनेकडे एक – एक सदस्य निवडून आणण्यासाठी लागणारी सदस्य संख्या होती आणि वर अपक्षांच्या मदतीने ३० – ३५ मतांची जादा बेगमी होणार होती.पण मॅजिक फिगर(Magic Figur)  गाठण्यासाठी दमछाक होईल हे निश्चित होतं.अगदी विरोधी पक्ष भाजपकडे देखील तशीच अवस्था होती.दोन वर्षापूर्वी आम्ही दोन सदस्य निवडून आलो होतो म्हणून यंदा दुसरा अतिरिक्त सदस्य सेनेचा निवडून आणू अशी घोषणा शरद पवारांनी (Sharad Pawar)  केली.त्यादिवशीच काँगेस,राष्ट्रवादीचा एक – एक आणि सेनेचे दोन उमेदवार या निवडणूकीत असतील हे निश्चित झालं होतं.पुढे अचानक संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांची एंट्री आणि मग झालेले राजकारण हे सगळं आपण बघितलंय.त्याच्या तपशीलात जाण्याचं काही कारण नाही.पण पुढे प्रत्यक्ष मतदानाच्या दोन – चार दिवसाच्या काळात जे राजकारण झालं ते असच चालू राहिलं तर खरचं येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याशिवाय राहणार नाही.हे निश्चित.

शिवसेनेकडून (Shivsena) संजय राऊत आणि संजय पवार,राष्ट्रवादीकडून (NCP) प्रफुल्ल पटेल आणि काँगेसकडून (Congress) इमरान प्रतापगढी यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.तर भाजपने पियूष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. पियूष गोयल,प्रफुल्ल पटेल,अनिल बोंडे,इमरान प्रतापगढी यांच्या विजय तर निश्चित मानला जातच होता पण धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्या लढाईत थेट कसं लागणार होता तो त्यांच्या पक्षांचा आणि वरिष्ठ नेत्यांचा.नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हे प्रकरण स्वतः लक्ष घालण्यापेक्षा दरबारी राजकारणी असलेल्या लोकांच्या हातात दिलं आणि लढाई तिकडचं फसली.तर बेरकी देवेंद्र फडणविसांनी (Devendra Fadanvis) चाणाक्ष खेळी स्वपक्षीयांसोबतचं इतर अनेक छोट्या – मोठ्या पक्षांच्या आमदारांसोबत अनेक अपक्षांना देखील आपल्या बाजूने वळवले आणि विजयी खेळी सुरू केली.त्यानंतर लागलेला निकाल आपल्यासमोर आहे.या निकालावरून देवेंद्र फडणवीस हे अजून देखील आपला दबदबा राखून आहेत हे स्पष्ट होतं.राज्याच्या राजकारणाचा एक मोठा पट त्यांच्या लक्षात आलाय आणि त्यांनी यशस्वी रीतीने समजून घेत लागू सुध्दा केलाय.म्हणून यापुढच्या निवडणुकात यशस्वी व्हायचे असेल तर मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या साथीदारांना किमान महाराष्ट्र राज्यपट समजून घेणे भाग आहे अन्यथा राज्यात सत्तांतर निश्चित आहे ! सोबतच साथीदार कितीही विश्वासू असले तरी त्यांच्यावर विसंबून चालणार नाही ही बाब देखील महाविकास आघाडीला लक्षात घ्यावी लागेल.