महामंडळ वाटपाची प्राथमिक चर्चा पूर्ण ? शिंदे गटाला मिळणार झुकते माप

मुंबई : भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत महामंडळे आणि शिर्डी, सिद्धिविनायक अशा धर्मादाय संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी नियुक्त्यांबाबत प्राथमिक चर्चा मंगळवारी पूर्ण झाली. मुंबई म्हाडा शिवसेनेकडे तर सिडको भाजपकडे, सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे तर साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद भाजपकडे असे विविध महामंडळांचे प्राथमिक वाटप झाले असून एसटी, म्हाडा अशा काही महामंडळांवर अध्यक्षांच्या स्वतंत्र नियुक्त्या होणार असून त्या नोव्हेंबर अखेरीपर्यंत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महामंडळ वाटपास अंतिम स्वरूप देणार आहेत. राज्यातील महामंडळे, सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साईनाथ मंदिर, कोल्हापूर व पंढरपूर आदी देवस्थान मंडळांचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ आदी १२२ जागांवर दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. भाजप, अपक्ष व संलग्न आमदारांची संख्या १२८ पर्यंत आणि शिवसेनेच्या आमदारांची संख्या ४० असली तरी शिंदे गटामुळे भाजपला सत्ता मिळाल्याने महामंडळ वाटपातही झुकते माप दिले जाणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी नऊ मंत्र्यांना स्थान देण्यात आले. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच सांगितले असून विस्तार आणि महामंडळ वाटपातही गेल्या विस्ताराच्या सूत्रानुसार साधारणपणे निम्म्या जागा दोन्ही पक्षांना दिल्या जातील. सर्व महामंडळे व संस्थांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची वर्णी लागणार असून शिंदे गटातील आमदारांची नाराजी अधिक असल्याने ज्यांना आगामी विस्तारात मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, त्यांना महामंडळांवर सामावून घेतले जाणार आहे, असे उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील तर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून दीपक केसरकर, उदय सामंत हे मंत्री महामंडळ वाटपाच्या चर्चामध्ये सहभागी आहेत.