अब्दुल सत्तारांची आता खैर नाही; शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या डरकाळीचा आवाज घुमणार 

 औरंगाबाद –  औरंगाबादमध्ये (Aurangabad News) शिवसंवाद यात्रा (Shiv Samwad Yatra) काढणाऱ्या आदित्य ठाकरेंना सिल्लोडमधून शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी असे चॅलेंज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यामुळे सत्तार यांचे चॅलेंज स्वीकारत आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये शिवसंवाद यात्रा काढत मेळावा घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली आहे. सोबतच आदित्य ठाकरे हे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात देखील शेतकरी मेळावा घेणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसीय औरंगाबाद दौरा असणार आहे. ज्यात 7 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे सिल्लोड मतदारसंघाचा दौरा करणार आहे. यावेळी ते सिल्लोडमध्ये शिवसंवाद मेळाव्याला हजेरी लावणार आहे. त्यानंतर मुक्कामी असणारे आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सद्यातरी भुमरे आणि सत्तार हे दोन्ही नेते ठाकरेंच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे.