अजित पवार म्हणाले त्याला जागा दाखवा, पण बारामतीनेच भाकरी फिरवत प्रदीप कंदांना जिंकवलं !

पुणे : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे ज्या जागेसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपाटले होते. या जागेवरून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदीप कंद विजयी झाले आहेत. प्रदीप कंद हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते होते होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे . त्यामुळेच अजित पवारांनी हि जागा प्रतिष्ठेची बनवली होती.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीमधून 52 मतं मिळाली आहेत.

दरम्यान, पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.