जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार, गोपीचंद पडळकरांचा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नीट आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजत असून त्यावरून आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही’ असं वक्तव्य केलं आहे. याबाबतचा व्हिडीओ भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

‘ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,’ असं जितेंद्र आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.

‘ओबीसींवरती ब्राम्हण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,’ असं आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, यानंतर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. . जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा सवाल पडळकर यांनी आव्हाड यांना केला. तर, जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार आहेत, अशी खोचक टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.