Pune News | पुण्यात आघाडीत बिघाडीची शक्यता; विधानसभेच्या ‘या’ मतदारसंघांवर सेनेचा डोळा

Pune News | पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सहा विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर ,पर्वती, वडगाव शेरी, खडकवासला यांच्यासह शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचा समावेश आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटकडून देखील कोथरुड,पर्वती,हडपसर वडगाव शेरी, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघांवरती दावा करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईमध्ये पुण्यातील विधानसभा निहाय पदाधिकाऱ्याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, रवींद्र मिर्लेकर हे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निहाय अहवाल यावेळी सादर केला. अहवालाच्या माध्यमातून आमची कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकद आहे. तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मध्ये या जागा आपल्याला मिळाल्यास त्या कशा जिंकून आणू शकतो याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन काही जागांची आम्ही मागणी केली असल्याची माहिती मोरे यांनी माध्यमांना दिली.

पुणे शहरातील (Pune News) आठ विधानसभा मतदारसंघापैकी कोथरूड, हडपसर वडगाव शेरी, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या पाच जागांची मागणी आम्ही केली आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ताकदीवर ती जागा महाविकास आघाडीला मिळाल्याने या जागेसाठी देखील शिवसेना ठाकरे गट आग्रही असणारा असल्याचे सांगत एकूण 6 जागांची मागणी आमची आल्याचे मोरे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणूक, सध्याची त्या विधानसभा मतदारसंघांमधील असलेली शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणि यापूर्वी शिवसेनेचा आमदार त्या जागेवर निवडून आला असल्याच्या बेसिसवर जागांची मागणी आम्ही केली असल्याचं मोरे म्हणाले.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत मध्ये महायुती मध्ये असताना पुण्यातील एकही जागा आम्ही लढली नव्हती मात्र आता पुण्यातील शिवसेनेची ताकद या निवडणुकीमध्ये दाखवून देण्याची आम्हाला संधी आहे. त्यामुळेच ज्या जागांवरती आमची जास्त ताकद आहे त्याच जागांची मागणी आम्ही केली असल्याचं मोर यांनी सांगितलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप