गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे; पटोले भाजपवर बरसले

मुंबई – नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald case) सक्तवसुली संचालनालयानं (ED) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना 21 जुलै रोजी हजर राहण्याची सूचना दिली आहे. यापूर्वी 23 जून रोजी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र कोरोना (Corona) संसर्ग झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्याची विनंती सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची याच प्रकरणी 5 दिवस 54 तास चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी भाजपला (BJP) लक्ष्य केले आहे. भाजपचे केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करत असून, विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूड भावनेने पाठवलेली आहे. भाजपच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, असे  पटोले म्हणाले.

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँड्रिंगचा गुन्हा कसा होतो? २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप पटोले यांनी केला.