मनपाच्या कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला; पोलिस तक्रारीनंतर तीन आरोपींना अटक

नागपूर  : पावसाळी नाल्यांची सफाई करणा-या मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांवर तीन युवकांनी तलवार आणि गुप्ती द्वारे हल्ला करून जखमी केले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देउन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी दिली.(Armed attack on municipal employees; Three accused arrested after police complaint in nagpur).

शनिवारी (ता.१७) धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड यशवंत नगर येथे झोनच्या लोककर्म विभागाचे   सातपुते व आरोग्य विभागाचे विक्रम चव्हाण हे जेसीबी च्या माध्यमातून पावसाळी नाली सफाई करीत होते. दुपारी २ वाजता दरम्यान सदर ठिकाणी तीन युवक दारू पिउन आले व त्यांनी काम करीत असलेल्या कर्मचा-यांना शिविगाळ केली. कर्मचाऱ्यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. मात्र ते धारधार तलवार व गुप्ती घेउन कार्यस्थळी आले आणि कर्मचा-यांना मारण्यास धावले.

युवकांच्या हल्ल्यातून बचाव करीत असताना सातपुते यांच्या हाताची बोटे कापली गेली तर  विक्रम चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेउन सदर घटनेची माहिती देत तक्रार नोंदविली. पोलिस विभागामार्फत तिनही युवकांना अटक करण्यात आली असल्याचेही सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी सांगितले.